आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाची देखभालीअभावी दूरवस्था
गोवा -मुंबई महामार्गावर आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाची देखभालीअभावी दूरवस्था झाली आहे.कुंडाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा नैसर्गिक ठेवा नष्ट होण्याची भिती पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युती शासनाने या कुंडांना क वर्ग पर्यटनस्थळांचा दर्जा दिला होता. त्या वेळी अंदाजे ४० लाख रुपये खर्चून कुंडाकडे जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग, महिला व पुरुषांसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली, कुंडाच्या वरील बाजूस पत्र्याचे छप्पर आदी कामे केली होती. त्यानंतर या स्थळाच्या दुरुस्तीकडे पर्यटनखात्याने लक्ष दिले नाही. येथील झऱ्यांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान अथवा हात-पाय धुण्याची सोय केली आहे. या झऱ्यातून बारमाही गरम पाणी वाहते. जसे गोवा-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तसे या कुंडाच्या सौंदर्याला ओहोटी लागली आहे.