रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील दयानंद चौघुले खून प्रकरण पुन्हा पटलावर
_रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील दयानंद चौघुले खून प्रकरण पुन्हा पटलावर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आल्या नंतर याची सुनावणी घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याची पडताळणी करत महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे तसेच महेंद्र झापडेकर या आरोपींना आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आदेश दिले आहेत.रत्नागिरीतील रामचंद्र चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ९ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महेश शिंदे, कुमार शिंदे, किशोर शिंदे आणि महेंद्र झापडेकर हे त्यांच्या घरी पाली येथे आले होते आणि रामचंद्र यांचा मुलगा चिन्मय याने मुलीला मेसेज केल्या संदर्भात लोकांची तक्रार आहे त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्याला आमच्या चांदेराई येथील गावात येऊन माफी न मागितल्यास त्याचे काय करायचे ते बघतो अशी धमकी दिली होती.यावर दिनांक १० फेब्रुवारी २०१७ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता रामचंद्र चौघुले हे मुलगा चिन्मय, त्यांचा भाऊ दयानंद, गुरुप्रसाद तसेच इतर मित्र हे कुमार शिंदे यांच्या चांदेराई येथील घरी माफी मागण्यासाठी गेले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही माफी मागायला आलो आहोत असे सांगितले. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता रामचंद्र यांचा मुलगा चिन्मय याला मारहाण करायला आरोपींनी सुरुवात केली.चिन्मयला वाचवण्यासाठी काका दयानंद चौगुले मध्ये गेला असता त्याला महेंद्र झापडेकर, कुमार शिंदे, महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे यांनी लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात दयानंद याच्या छातीत जोरदार आघात केल्यामुळे दयानंद हे जागीच कोसळले. त्यानंतर रामचंद्र तसेच इतर यांनी दयानंद याला गाडीमध्ये घेऊन सिविल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दयानंद चौगुले याला मृत घोषित केले.त्यामुळे कुमार शिंदे, महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे आणि महेंद्र झापडेकर यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधानसंहीतेच्या कलम ३०२, १४३, १४७, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन त्यामध्ये आरोपींना ३२३, १४३,१४९ या कलमान्वये सर्वांना सहा महिन्याची शिक्षा तसेच दंड ठोकवण्यात आला. परंतु न्यायालयाने कलम ३०४, ५०४, ५०६ कलमा अंतर्गत पुराव्या अभावी मुक्तता केली होती. दिनांक १४ जुलै २०२२ रोजी रत्नागिरी सत्र न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात तक्रारदार रामचंद्र चौगुले यांनी ॲड. राकेश भाटकर यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली.मुंबई उच्च न्यायालयाने अपिलामध्ये दाखल केलेले मुद्दे , असलेल्या पुराव्याची पडताळणी करत महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे तसेच महेंद्र झापडेकर या आरोपींना आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आदेश केले असून आठ आठवड्यानंतर या अपिलाची सुनावणी ठेवली आहे.