रत्नागिरी स्थानिक राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेल्या अवस्थेत-मनसे नेते अविनाश अभ्यंकर
रत्नागिरी स्थानिक राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेल्या अवस्थेत आह़े. एक रस्ता होण्यासाठी 17 वर्षे लागतात ही अत्यंत दुर्देवाची बाब म्हणता येईल. कोकणी जनता ही सहनशील आहे, याचाच गैरफायदा येथील लोकप्रतिनिधी घेत असतात. खड्यांनी भरलेल्या महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी न झाल्यास मनसे स्टाईल दाखविली जाईल असा इशारा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला.विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून चाचपणी केली जात आहे तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या जात आहे. यासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अभ्यंकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत संताप व्यक्त करताना अविनाश अभ्यंकर म्हणाले की, राज ठाकरे सत्तेत असते तर रस्ता कसा होत नाही तेच पाहिले असते. रस्त्यावर लोकांचे जीव जात आहेत आणि सरकार केवळ पैसे वाटण्याचे काम करत आहे सर्वसामान्य लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का? असा प्रश्न अभ्यंकर यांनी उपस्थित केला.विधानसभा निवडणूकीच्या तयारीविषयी अभ्यंकर म्हणाले, रत्नागिरीच्या सर्व तालुक्यांचा आढावा पक्षाकडून घेतला जात आहे. लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्याच्या सर्व जागा लढविण्याची पक्षाकडून तयारी केली जात आहे. पक्षाकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. कोरोना काळात आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून केलेली कामे जनता विसरलेली नाह़ी त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल.कोकणाला निसर्गाने भरभरुन दिले आह़े केवळ पर्यटन व निसर्ग यावर काम केल्यास येथील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाह़ी. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासने दिली. कुणी म्हणाले आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करु पण आम्ही असा दावा करणार नाही. कोकणी माणसांच जीवन सुखकर कसे होईल याचाच विचार मनसे करेल. कोकणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे ही आमची कायमच भूमिका राहिली आहे.निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून योजनांच्या नावाखाली उधळपट्टी चालली आहे. राज्यावर 8 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोझा आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्षात लाडकी बहिण, लाडका भाऊ या योजना राबविणे शक्य हाईल का असा प्रश्न पडतो असेही ते म्हणाले