
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा 2 हे स्पधात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह जिल्ह्यातआज पासून सुरू
रत्नागिरी:- शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देणे यासाठी 29 जुलैपासून जिल्ह्यात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा 2 हे अभियान सुरु होणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 2500 व 378 माध्यमिक शाळांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास 95% शाळांमधील सुमारे 2 कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे.या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली.उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन 2024-25 देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा 2 हे स्पधात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.