गुरुपौर्णिमे निमित्त अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ मंदिरात, शिर्डीच्या साई मंदिरात आणि शेगावमध्ये गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दखल झाले आहेत. सोलापूरतल्या अक्कलकोट येथे दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येने येत असतात.मंदिराचे मुख्य पुजारी, चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन पुजारी यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली. अगदी रात्री पासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते. गेला आठवडाभर गुरुपौर्णिमाचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत. तसेच शिर्डीच्या साई मंदिरात आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्येही देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी लीन होण्यासाठी हजारो भक्त साईनगरीत दाखल झाले आहेत. देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईबाबांना गुरू मानणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे.आज गुरुपौर्णिमा असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात देशभरातून भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक दिंड्या व हजारो भाविक हे शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांगही लागली आहे.