राज्यातील 193 एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून 600 कोटी,बसस्थानके, गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची -पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. 19 राज्यातील 193 एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 600 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 3 कोटी 34 लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेल्या पाली बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांसह सर्वांचीच आहे, त्याचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. पाली येथील एसटी बसस्थानकाचे लोकार्पण फित कापून आणि कोनशिला अनावरण करुन पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज केले. याप्रसंगी सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष घाडगे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, बाबू म्हाप, विनया गावडे, गोकुळचे संचालक मुर्लीधर जाधव, कांचन नागवेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यातील रत्नागिरी, जाकादेवी, पावस, लांजा, गणपतीपुळे आदी बसस्थानकांच्या विकासासाठी एमआयडीसीकडून 80 कोटी मंजूर केले आहेत. अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम केले आहे. गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यामधील बसस्थानकांच्या सुशोभिकरणासाठी 10 कोटी देण्यात आले आहेत. दररोज 35 ते 40 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. पालीमधील सुसज्ज एसटी बसस्थानकांमधील उपहारगृहात कमी दरात चांगले पदार्थ द्यायची सोय परिवहन महामंडळाने केली पाहिजे. बसस्थानकावरील हिरकणी कक्ष वातानुकुलित करण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानके स्वच्छतागृहे, स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पाली हे गाव विकासातील आदर्श मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने दिलेल्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. विभाग नियंत्रक ज्ञानेश बोरसे यांनी स्वागत प्रस्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. उदय पालकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील पाली बसस्थानक काँक्रीटीकरण व इतर कामे करणे यासाठी 4 कोटी 39 लाख 10 हजार 600 रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 3 कोटी 34 लाख एवढा निधी खर्च करुन हे काम पूर्ण करण्यात आले आहे. बसस्थानकामध्ये 6 फलाट बांधण्यात आले आहेत. दिवसभरातील 262 बसफेऱ्यांमधून 7 हजार पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होणार आहे. इमारतीमध्ये प्रवेश दालन, प्रशस्त प्रवाशी प्रतिक्षालय, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, उपहारगृह, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा, पाण्याची सुविधा, जनऔषधालय, 3 वाणिज्य आस्थापना, स्वतंत्र आरक्षण कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष व स्थानक प्रमूख कार्यालय, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांकरिता पुरुष व महिला कर्मचाऱ्यांकरिता स्वतंत्र विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button