सावर्डे येथे सदनिका खरेदी प्रकरणात शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बाबु म्हाप यांचे बंधू शेखर म्हाप यांची महिलेकडून २३ लाख रुपयांची फसवणूक
रत्नागिरी : सावर्डे येथील ३ सदनिका खरेदी प्रकरणात शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बाबु म्हाप यांचे बंधू शेखर म्हाप यांची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी २०२३ ते ३० जून २०२४ या मुदतीत घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. शेखर शांताराम म्हाप यांनी अश्विनी महेश ओझा (रा. इचलकरंजी, हातकणंगले) यांच्यासोबत सप्टेंबर २०२१ मध्ये सदनिका खरेदी करण्याबाबत हातखंबा येथील शेखर म्हाप यांच्या कार्यालयात बोलणी झाली होती. १ एप्रिल २०२४ रोजी प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या आगवे वहाळ फाटा, सावर्डे याठिकाणी जाऊन स्टील्ट वरील पहिल्या मजल्यावर असलेल्या २०१, २०२, २०३ या सदनिका ४० लाखांना विकत घेण्याबाबत ठरले. त्याप्रमाणे २० सप्टेंबर २०२१ रोजी यातील अश्विनी महेश ओझा यांच्यावर विश्वास ठेवून शेखर म्हाप यांच्या शांती स्टोन क्रशर या कंपनीच्या नावाने असलेल्या गयाळवाडी येथील बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे २० लाख ५० हजार रुपयांची रक्कम ओझा यांच्या पुणे येथील बँक खात्यात जमा केली होती व त्याच दिवशी शेखर म्हाप यांचा मुलगा सुमित शेखर म्हाप यांच्या खेडशी येथील बँक खात्यातून २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ओझा यांच्या खात्यावर जमा केली होती. ३ सदनिकांसाठी २३ लाख रुपये म्हाप यांनी त्या महिलेच्या खात्यावर जमा केले होते. १ वर्ष झाल्यावर साठेखत किंवा खरेदीखत करून देण्यास ओझा यांनी टाळाटाळ केली. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्या वेळ मारून नेत होत्या. म्हाप यांनी वारंवार ओझा यांच्याशीसंपर्क साधला. अखेरीस त्यांनी सहभागीदारांना सांगून नोंदणीकृत दस्तऐवज करून देते असे ओझा यांनी सांगितले होते. मात्र या तिन्ही सदनिका अन्य व्यक्तींना विक्री करून अश्विनी महेश ओझा यांनी शेखर म्हाप यांची आर्थिक फसवणूक केली.याप्रकरणी शेखर म्हाप यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अश्विनी महेश ओझा यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता ४२०, ४०६ व भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.