संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळ्यादरम्यान अश्व अंगावर कोसळून एका छायाचित्रकाराचा दुर्देवी मृत्यू
पंढरीच्या वारीतून एक वाईट बातमी आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळ्यादरम्यान अश्व अंगावर कोसळून एका छायाचित्रकाराचा दुर्देवी मृत्यू झाला.पुरंदवडे येथील रिंगण सोहळ्यात घडलेल्या या घटनेनं सर्वांना धक्का बसला. वारकरी हळहळ व्यक्त करत आहेत.या घटनेत कोलकात्याचे रहिवासी असलेले 48 वर्षीय कल्याण चटोपाध्याय यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एक तरुण जखमी झाला आहे. रिंगणातून धावणाऱ्या अश्वाच्या डोक्यावर घोंगावणाऱ्या ड्रोनच्या आवाजाने तो बिथरला. त्यामुळे अधिक वेगात धावण्याच्या प्रयत्नात असताना अश्वाचा त्याच्या लगामात पाय अडकला आणि तोल गेल्याने गर्दीत बसलेल्या लोकांवर कोसळला.अंगावर अश्व पडल्याने गंभीर जखमी झाल्यानं उपचारादरम्यान चटोपाध्याय यांचा मृत्यू झाला. वारी आणि रिंगण सोहळ्यात दिवसेदिवस वाढत असलेली गर्दी आणि रिंगण सोहळ्याचे नियोजन यामध्ये सुसंगती नसल्याने ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचे म्हणण आहे.घडलेली घटना दुर्दैवी असून मयत चटोपाध्याय यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी सांगितले. तसेच पुढील काळात होणाऱ्या सोहळ्यात ड्रोनवर काही निर्बंध आणावेत, अशी प्रशासनाकडे मागणी केल्याची माहिती नाथ यांनी दिली.