
सीएनजी-पीएनजीच्या दरात होणार वाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!!
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये उद्यापासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे.महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आज रात्रीपासून नवे दर लागू होणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ होणार असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका होणार आहे.सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता मुंबईतील वाहन धारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यांना सीएनजीच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील बऱ्याच रिक्षा, टॅक्सी या सीएनजीवर चालतात.तर, मुंबईत अनेक जण अन्न शिजवण्यासाठी पीएनजीचा वापर करतात. आता पीएनजीमध्ये देखील वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.