18 व्या लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ओम बिर्ला जिंकले! आवाजी मतदानानं झाली निवड!!
लोकसभा अध्यक्षपदासाठी सभागृहात निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला हे निवडून आले आहेत. आवाजी मतदानानं यासाठी सभागृहात मतदान घेण्यात आलं. यामध्ये बिर्ला यांना १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उमेदवार होते.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला हे जिंकल्याची घोषणा प्रोटेम स्पिकर भतृहरी महताब यांनी केली. त्यानंतर बिर्ला यांना पंतप्रधान मोदी, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं आणि विराजमान होण्याची विनंती केली.
दरम्यान, ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्याला हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी यांनी अनुमोदन दिलं. बिर्ला यांच्या नावासाठी १३ पक्षांनी पाठिंबा दर्शवला. तर के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. त्याला इंडिया आघाडीनं पाठिंबा दर्शवला. लोकसभेत एनडीएकडं बहुमत असल्यानं ओम बिर्ला हे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले.
www.konkantoday.com