
नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ऍड. दीपक पटवर्धन विजयी होणार भाजपा नेते व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार दीपक पटवर्धन यांचेसाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते एकत्रित आले असून निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरली असून भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपचे नेते व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपा उमेदवार दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, भाजपचे नेते नाना शिंदे, ऍड. भाऊ शेट्ये, सतिश शेवडे, सचिन वहाळकर, माजी नगराध्यक्ष अशोकजी मयेकर आदीजण उपस्थित होते.
दीपक पटवर्धन यांनी भाजपातर्फे अर्ज दाखल केला. त्यावेळी माजी आमदार बाळ माने हे परदेशी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. असेही चव्हाण यांनी सांगितले. बाळासाहेब माने व आपण गेली ३५ ते ४० वर्षे भाजपमध्ये काम करीत आहोत. त्यामुळे ते नाराज असण्याचा प्रश्न येत नाही. भाजप ही एक संघटना आहे. संघटनेमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात परंतु मनभेद मात्र नाहीत असा स्पष्ट खुलासाही चव्हाण यानी केला. भाजपचे नेते मुकुंद जोशी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता याबाबत त्यांच्याशी सर्व पातळीवर चर्चा सुरू असून ते आपला अर्ज मागे घेतील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. जोशी यांच्या मागे भाजपमधील कोणीही नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपचे कार्यकर्ते हे भाजपच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहतील असा ठाम विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. रत्नागिरी शहरात गेली अनेक वर्षे सत्ता असूनही शहराच्या अनेक समस्या, मुलभूत सोई व नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे याबाबत आता भाजप या प्रश्नावरून निवडणुकीत रान उठवणार आहे. लोकांशी संपर्क असलेला वेगवेगळ्या सामाजिक संस्थेत कार्य करणारा सर्वच थरात दांडगे संपर्क असलेले पारदर्शी नेतृत्व दीपक पटवर्धन यांच्या रूपाने शहरवासियांना लाभले आहे. त्यामुळे शहरवासिय त्यांना निवडून देणार याची आम्हाला खात्री आहे असेही त्यानी सांगितले.
www.konkantoday.com