
कोरोनाचा बुस्टरडोस घेण्यास नापसंती
रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ 14 टक्केच नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या जास्त असून, ती जवळपास 90 टक्के इतकी आहे. या वरून तिसर्या डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या कोव्हीशिल्ड व लसीचा साठा संपलेला असून, शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
चीनसह ब्राझील, अमेरिका आदी देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरण तातडीने करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर बूस्टर डोस घेतलेले नसलेल्यांना लसीकरणामुळे जागरूक करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 58 हजार 223 नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे तर 9 लाख 13 हजार 296 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच बूस्टर डोस घेणार्यांची संख्या 1 लाख 27 हजार 843 इतकी आहे. यावरून अजूनही 7 लाख 85 हजार 453 जणांनी बूस्टर डोस घेतलेला नसल्याचे दिसून आले आहे. अजूनही जवळपास 86 टक्के नागरिकांनी या डोसकडे पाठ फिरवली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्व आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हास्तरावरून करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 85 हजार 845 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 83 हजार 300 लोक बरे झाले आहेत तर 2 हजार 545 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या कोव्हीशिल्डचा साठा संपला असून, त्याची मागणी शासनाकडून करण्यात आल्याचे जि. प. आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.