रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी निवड करण्याचे आमिष दाखवून चिपळूणातील दोन खेळाडूंसह पाच उदयोन्मुख क्रिकेटपटूंची ६३ लाख रुपयांची फसवणूक,मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला
आता क्रीडा क्षेत्रात देखील पैसे घेऊन फसवणुकीचे प्रकार घडत असूनरणजी स्पर्धेत खेळण्यासाठी निवड करण्याचे आमिष दाखवून पाच उदयोन्मुख क्रिकेटपटूंची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. चिपळूण येथून व्यापारी संतोष चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईतील दोघांविरोधात शुक्रवारी (ता. १४) गुन्हा दाखल झाला आहे. पैसे देणाऱ्यांमध्ये दोन खेळाडू चिपळूण तालुक्यातील आहेत.पोलिसांमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार चव्हाण काही मित्रांमार्फत २०१८ मध्ये मुंबईतील प्रशांत कांबळे आणि देवेश उपाध्याय यांच्या संपर्कात आले होते. त्या दोघांनीही रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी नवीन खेळाडूंची निवड करू शकतो, असे चव्हाण यांना सांगितले. त्या दोघांवर विश्वास ठेवून चव्हाण यांनी अक्षय कामथ, रवींद्र पाटील, आकाश पाटील, राम कांबळे आणि विकास चौधरी या पाच उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सांगितले.त्यामध्ये रवींद्र पाटील आणि राम कांबळे हे दोघे चिपळूण येथील स्थानिक आहेत. त्या क्रिकेटपटूंनी रणजीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. चव्हाण यांनी त्या खेळाडूंकडून ६३ लाख रुपये घेतले आणि जून २०१८ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत दोन संशयितांना दिले. मालाड (पश्चिम) येथील एका हॉटेलमध्ये ही रक्कम संशयितांना देण्यात आली, असे तक्रारीत नमूद केले आहे.विश्वास संपादन करण्यासाठी त्या दोन संशयितांनी चव्हाण यांना रणजी स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंच्या निवडीबाबतची काही कागदपत्रेही दाखवली. मात्र त्या पाचही तरुणांची निवड झाली नाही. चव्हाण यांनी त्याबाबत दोघांना विचारले असता त्यांनी विविध कारणे देत टोलवाटोलवी करण्यास सुरवात केली. चव्हाण यांनी त्या दोघांकडे बराच पाठपुरावा केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी त्या दोघांकडे पैसे मागण्यास सुरवात केली. मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे चव्हाण यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे