
विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बालवैज्ञानिकांची राज्यस्तरावर भरारी
कृषीआधारीत प्रकल्पामुळे जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव; 52 व्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांकाचे यश.
रत्नागिरी ः तालु्नयातील मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुवारबाव, रत्नागिरीचे विद्यार्थी तालुक्यात जरी तृतीय क्रमांकावर चमकले तरी जिल्ह्यात मात्र ते द्वितीय क्रमांक प्राप्त करण्यात यशस्वी ठरले. यामुळे त्यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. अमरावती येथे 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये विसपुते इंग्लिश मिडियम स्कूलचे बाल वैज्ञानिक आता आपले प्रदर्शन सादर करणार आहेत. यामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका विभावरी जोईल अमरावती येथे विद्यार्थ्यांसह उपस्थित राहणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरी आणि नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ, नाणीज संचलित माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन 2024-25 दिनांक 09 व 10 जानेवारी 2025 या कालावधीत संपन्न झाले. सदर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्ह्यामधील नऊ तालु्नयातील प्रथम तीन क्रमांकांनी सहभाग घेतला होता. सदर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ पनवेल, नवी मुंबई संचलित मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुवारबाव या शाळेस उच्च प्राथमिक स्तरामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

प्रशालेतील उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी या वर्गातील निवडक विद्यार्थ्यांनी शाश्वत शेती ही प्रतिकृती उत्तम पद्धतीने तयार केली होती . यामध्ये सदयस्थितीत जगाला अशा शाश्वत शेतीची गरज का आहे? तसेच वाढत्या अन्नधान्याची गरज निसर्गचक्राला बाधा न आता आपण कशी करू शकतो? याची उत्तम माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केली. यामुळे जिल्हा स्तरावर सदर प्रशालेने द्वितीय क्रमांकाचे यश खेचून आणले आहे. यामध्ये प्रेम सुरेंद्र सावंत, प्रियांशू प्रमोद बोडस, अस्मि अरुण सावंत, शर्वरी श्याम गावकर या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला.सदर प्रकल्पासाठी मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल, कुवारबाव, या प्रशालेच्या संचालिका श्रीमती नंदा शेलार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका विभावरी जोईल, प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ. सान्वी सावंत आदींचे मुख्यत्वे करून मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या अशा घवघवीत यशाबद्दल ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ पनवेल, नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, सचिव संगिता विसपुते, गट शिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, एज्युकेशन अँड स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव, प्रशालेचा पालकवर्ग व समाजातील सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे अभिनंदन केले आहे.