राजापुरातील नव्या धरणाचे पैशा अभावी काम थांबले
राजापूर : गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरवासीयांना भेडसावत असलेली एप्रिल-मेमधील पाणीटंचाईची समस्या यावर्षीही कायम आहे. भविष्यामध्ये पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी सायबाच्या धरणाच्या येथे नव्याने बांधण्यात येणारे धरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. या धरणाच्या कामासाठी १० कोटीचा निधी मंजूर झाला होता. या धरणाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, अद्यापही वीस टक्के काम निधीअभावी शिल्लक आहे. त्यामध्ये सतरा गेट वा गाळ्यांसह अन्य स्वरूपाच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे सात कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कोदवली येथील सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षापासून शहराचा मुख्य जलस्रोत आहे. या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने शहराला दरवर्षी एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. रखडलेल्या कामांमध्ये सतरा झडपे वा गाळ्यासह जोडरस्ता, वीजेची सुविधा यांसह अन्य स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे. धरणाच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी येथील पालिकेने शासनाकडे केली आहे.