सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला सापत्नपणाची वागणूक दिली- शिंदे गटाची तक्रार
*. शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला सापत्नपणाची वागणूक दिली. विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका, निवड समितीत आपल्याला भाजपाने विश्वासात घेतले नाही, अशा शब्दांत शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजप नेते तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचत नाराजी व्यक्त केली.तसेच निवडणुकीत नारायण राणेंचे काम न करण्याचे सांगण्यात आल्याचे समजते, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली ही समन्वय समितीची बैठक अर्ध्यावरून गुंडाळावी लागली. आता याबाबत पुन्हा २३ एप्रिलला कुडाळ आणि कणकवली येथे समन्वय समितीची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे.रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कुडाळमधील शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वीच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर (दि.२१) झाराप येथे भाजप नेते तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, उद्योजक किरण सामंत यांच्यासह कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड व वैभववाडी या पाच तालुक्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com