
…तर केंद्रीय निवडणूक आयुक्त जेलमध्ये जातील! ईव्हीएम हटाओ सेनेचा इशारा!
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाला आहे. हा मोठा इलेक्शन स्कॅम आहे. निवडणुकीनंतर 100 हून जास्त उमेदवारांनी त्यांच्या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे हा स्कॅम उघडकीला आला तर शेरोशायरी करणारे, माहिती लपवणारे केंद्रीय निवडणूक आयुक्त हे जेलमध्ये जातील, असे मत ईव्हीएम हटाओ सेना आणि मतपत्रिकेसाठी लोकचळवळ उभारणाऱ्या पीपल्स मूव्हमेंट टू ब्रिंग बॅक बॅलेट पेपरने (पीएमबीबीबीपी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केले.
फोर्ट येथील मुंबई प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम हटाओ सेना आणि पीएमबीबीबीपीने ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीन्समध्ये गडबड केली जाऊ शकते, मतांची चोरी केली जाऊ शकते, याचे मशीनच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सादर केले. केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणतात की, या मशीन्स वन टाईम प्रोग्राम केलेल्या आहेत.
मात्र, या मशीन्स मल्टी-प्रोग्राम केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जर केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी मशीन्सबद्दल माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असेल आणि हा घोटाळा न्यायालयाच्या चौकशीनंतर उघड झाला तर पहिल्यांदा माहिती लपवणारे आयुक्त जेलमध्ये जातील, असा इशारा ईव्हीएम हटाओ सेनेचे धनंजय शिंदे यांनी दिला.