
लांजा पं. स. ची नवीन इमारत बांधण्यास निधी मंजूर; नागरिकांची गैरसोय टळणार
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी ह्यांनी गेली सुमारे ३ वर्षे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे जीर्ण झालेल्या व प्रशासकीय कामकाजासाठी अपुऱ्या पडणाऱ्या लांजा पंचायत समिती ची इमारत नव्याने बांधण्यास परवानगी मिळाली असून त्यासाठी सुमारे ₹ ३ कोटी ८० लाख ५५ हजार एवढा निधी मंजूर झाला आहे. नव्याने बांधण्यात येणारी इमारत सुसज्ज असणार आहे. तसेच पंचायत समिती च्या अधिपत्याखाली येणारी *सर्वच प्रशासकीय कार्यालये आता ह्या एकाच इमारतीमध्ये म्हणजे एकाच छताखाली येणार असून त्यामुळे पंचायत समिती मध्ये कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे. लांजा पंचायत समिती च्या नवीन इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीकडून सन २०१६ मध्ये देण्यात आला होता. त्यावर आमदार राजन साळवी ह्यांनी संबंधित खात्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये अधिवेशनामध्ये देखील तारांकित प्रश्न मांडून आमदार राजन साळवी ह्यांनी लांजा पंचायत समिती च्या नवीन इमारत बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत शासनाचे लक्ष वेधले होते. अखेर आमदार राजन साळवींच्या पाठपुराव्याला यश आले असून लांजा पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला असल्यामुळे काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर लवकरच नवी इमारत बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
www.konkantoday.com