ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा यासाठी सव्वा लाख क्यूआर कोडसह हापूस आंबा बाजारात
ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा व शेतकर्याला हापूसच्या अस्सलतेमुळे चांगला दर मिळवा, यासाठी आमच्या संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकर्यांना क्यूआर कोड शुल्क घेवून वितरित करण्याचे ठरविले आहे. यावर्षी आतापर्यंत सव्वा लाख क्यूआर कोड शेतकरी बांधवांनी वापरल्याची माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे सचिव मुकुंदराव जोशी यांनी दिली.ते म्हणाले, हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे ८ लाख व पेटी अथवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे १ लाख क्यूआर कोडचे टार्गेट ठेवले आहे. क्यूआर कोड तयार करून ते आमच्या संस्थेला पुरवण्यासंबंधी आणि ऍक्टिव्ह करण्यासंबंधी मीरो लॅब या कंपनीबरोबर करार केला आहे. फळावर लावण्याचा क्यूआर कोड आमची संस्था ६५ पैसे प्रति नग या दराने पुरवत असून बॉक्सवर लावण्यासाठी ३ रुपये दराने पुरवठा केला जात आहे. व बागायतदारांना कोड ऍक्टिव्ह कसा करावा, यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे. संस्थेची आर्थिक क्षमता एवढी सक्षम नसूनही जीआय नोंदणीतून येणार्या प्रोसेसिंग चार्जेसच्या गंगाजळीतून आमची संस्था प्रचार, प्रसार, कॅम्पस घेणे व शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यक्रम राबविणे अशा गोष्टी करत असते. संस्थेकडून इतर कोणत्याही प्रकारचे खरेदी-विक्री करणे वगैरे व्यवहार्य नाही आहेत. त्यामुळे संस्थेचे उत्पन्न मर्यादित आहे.www.konkantoday.com