
आरे अंगणवाडीचे छप्पर नादुरूस्त, छोट्या बालकांना धोका, पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष
रत्नागिरी तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत काळबादेवी क्षेत्रातील आरे अंगणवाडीचे छप्पर धोकादायक झाले असून या बाबात पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांकडे ग्रुप ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या महामारी मुळे सध्या अंगणवाडी बंद असली तरी ती सुरू झाल्यानंतर छोट्या बालकांसाठी धोकादायक ठरणार आहे. याशिवाय वाळवी लागल्याने छप्पराचे वासे तुटत आल्याने पत्रे सरकले असून पावसात इमारतीत पाणी येवून इमारत नादुरूस्त होण्याची शक्यता आहे.
आरे अंगणवाडीची इमारत २००२ साली बांधण्यात आली होती. त्यानंतर इमारतीचे कोणतेही देखभालीचे काम केले गेलेले नाही. या इमारतीच्या छप्परासाठी वापरण्यात आलेल्या लाकडी वाशांना वाळवी लागली असून हे वासे तुटायला आले आहेत. त्यामुळे इमारतीचे पत्रे सरकले असून या ठिकाणी अंगणवाडीत मुलांना बसविणे अत्यंत धोकादायक बनले आहे. याबाबत अंगणवाडी सेविका सौ. उन्नती कनगुटकर यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. ग्रुप ग्रामपंचायतीने १८.२.२०२१ रोजी इमारतीच्या छप्पराची दुरूस्ती तातडीने करावी यासाठी गटविकास अधिकारी पं. स. यावेळी पत्रव्यवहार करण्याचा ठराव केला. या ठरावाला आशिष कनगुटकर यांनी व सौ. मधुरा आरेकर यांनी अनुमोदन देवून ठराव एकमताने मंजूर झाला.
त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी पंचात सीमती यांचेकडेही ग्रुप ग्रामपंचायतीने पत्रव्यहार करून आरे अंगणवाडीच्या छप्पराची तातडीने दुरूस्ती करून मिळावी अशी मागणी केली. परंतु पत्रव्यवहार करून अनेक महिने उलटूनही याबाबत पंचायत समितीकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. आज कोरोनाच्या परिस्थितीमुळे अंगणवाडी बंद असली तरी जर या छप्पराची दुरूस्ती तातडीने झाली नाही तर छोट्या बालकांना धोकादायक होऊ शकते. याचा विचार करून या अंगणवाडीच्या छप्पराची तातडीने दुरूस्ती करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
www.konkanroday.com