लोकसभा मतदानापूर्वीच पैशाचा पाऊस! ४,६५० कोटी रुपये जप्त
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त होत असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या अधिकाऱ्यांनी ४,६५० कोटी रुपये जप्त केले आहेत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ‘सार्वत्रिक निवडणुका २०२४ दरम्यान जप्त केलेली रक्कम ही देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात नोंदवलेली सर्वाधिक रक्कम होण्याच्या मार्गावर आहे,’ असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यापूर्वीच ४,६५० कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.२०१९ मधील संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान ३,४७५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. आता २०२४ मधील निवडणुकीच्या मतदानाआधीच जप्त केलेली रक्कम याहून अधिक आहे. सर्वसमावेशक नियोजन, सहकार्य आणि एजन्सींकडून एकत्रित प्रतिबंधात्मक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानामुळे ही कारवाई शक्य झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.www.konkantoay.com