
रिक्त पदांमुळे बेजार असलेल्या वनविभागाला मेगाभरतीतून जिल्ह्याला मिळाले २१ वनरक्षक
गेल्या अनेक वर्षापासून रिक्त पदांमुळे बेजार असलेल्या वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाला अखेर दिलासा मिळाला आहे. वनविभागाच्या अलिकडेच झालेल्या मेगाभरतीतून जिल्ह्याला एकूण २१ वनरक्षक मिळाले असल्याने दीर्घ कालावधीनंतर या कार्यालयातील रिक्त पदांचा बॅकलॉग भरून निघाला आहे.जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८२४८.८ चौ.की.मी. असून त्यात अवघे ६२.५९ चौ. कि.मी. एवढे वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर वनाचे प्रमाण अत्यल्प आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेले हे वनक्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहे. जिल्ह्यात १५१९ खेडी असून त्यापैकी १५१५ वसलेली व ४ ओसाड आहेत. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्री पर्वताच्या उंच रांगा असून या पर्वत शिखरांची उंची साधारणपणे ४०० ते २००० मीटरपर्यंत आहेत. जिल्ह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्य असल्याने साहजिकच बिबट्यासह वन्यप्राण्यांचाा वावर जिल्ह्यात अधिक दिसतो. मात्र वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या वनांचे प्रमाण व त्या तुलनेने वनविभागाकडे असलेली मंजूर पदे याचा ताळमेळ बसत नाही. जिल्ह्यात वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागात गेल्या अनेक वर्षापासून वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने सेवेत असलेल्या कर्मचार्यांवर त्याचा अतिरिक्त ताण पडत होता. www.konkantoday.com