
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांबाबत जनआक्रोश समितीने लावले बॅनर
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याबाबत वारंवार जन आक्रोश समितीने शासन आणि ठेकेदार यांना दिशादर्शक आणि सूचना फलक लावण्याचे पत्र दिले होते. मात्र वारंवार मागणी करूनही शासन आणि ठेकेदाराने वाहन चालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने शासन किती उदासीन आहे हे दिसून येते. याबाबत जन आक्रोश समितीच्या पदाधिकार्यांनी स्वखर्चाने आणि देणगीतून मुंबई-गोवा महामार्गावर चालकांच्या सुरक्षेसाठी बॅनर लावले आहेत.मुंबई-गोवा महामार्गाचे गेले १४ वर्षे काम रखडले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि ठेकेदाराने डायव्हर्जन दाखवणारे फलक लावलेले नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना म्हणून मुंबई-गोवा जन आक्रोश समितीने चाकरमान्यांच्या सुरक्षेचा विचार करत शासनाला पत्र दिले होते. शिमगोत्सवापूर्वी महामार्गावर सूचना फलक लावून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी केली होती. मात्र ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याने जन आक्रोश समितीने स्वखर्चातून आणि देणगीतून बॅनर तयार केले आणि हे बॅनर आज मुंबई-गोवा महामार्गावर लावण्याचे काम सुरू आहे. महामार्गावर भरधाव येणार्या गाड्या आणि चाकरमानी गावाला येत असल्यामुळे अपघात होवू नयेत यासाठी हे दिशादर्शक फलक वांद्री, उक्षी, मानसकोंड, आंबेड, कोळंबे, कुरधुंडा, संगमेश्वर ते पलस्पे पर्यंत लावण्यात आले आहेत.www.konkantoday.com