*उपद्रवी वानर, माकडांना पकडण्यासाठी वनविभागामार्फत पिंजऱ्याची निर्मीती ,एका दिवसात ४० ते ५० वानर किंवा माकडे पकडण्याची क्षमता*
__रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदार माकडांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहे हे माकडे शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान करत असल्याने बागायतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आता या उनाड माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहेजिल्ह्यातील शेती-बागायतीसाठी उपद्रव ठरत असलेली वानरे, माकडे यांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान मिळाले आहे. उपद्रवी वानर, माकडांना पकडण्यासाठी वनविभागामार्फत पिंजऱ्याची निर्मीती करण्यात आली आहे. त्यामध्ये एका दिवसात ४० ते ५० वानर किंवा माकडे पकडण्याची क्षमता आहे. त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे एक पथक ३ ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये जालना येथून जाऊन वानर, माकड पकडण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आले. त्यामध्ये परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनपाल सताप्पा सावंत, वनरक्षक अरविंद मांडवकर यांचा समावेश होता. जिल्ह्यातील उपद्रवी वानर-माकडे पकडण्यासाठी आवश्यक असलेला पिंजरा तयार करण्याचे काम वनपाल सुरेश उपरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी सर्व सोयींयुक्त, वापरण्यास, हाताळण्यास व वाहतुकीस योग्य अशा पिंजऱ्याची निर्मिती केली आहे. या पिंजऱ्याचे प्रात्यक्षिक केळशी (ता. दापोली) येथे घेतले होते. उपद्रवी वानर, माकडे पकडण्यासाठी तयार केलेल्या पिंजरा चार पिंजऱ्याचे एक युनिट या पद्धतीचा आहे. यामध्ये दोन पिंजरे जमिनीवर ठेवले जातात व एक पिंजरा बोलेरो पीकअपमध्ये ठेवला जातो व एक रॅम्प पिंजरा बोलेरो पीकअपमधील पिंजऱ्यामध्ये वानर, माकड यांना घेण्यासाठी तयार केला आहे. जमिनीवरील पहिल्या पिंजऱ्यात वानर, माकडांसाठी खाद्य ठेवले जाते. त्याचा दरवाजा रस्सीच्या साह्याने उघड-बंद केला जातो. खाद्याच्या अमिषाने वानर पहिल्या पिंजऱ्यात आल्यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला जातो. या प्रकारे बंदिस्त झालेले वानर दुसऱ्या पिंजऱ्यात मध्ये घेतले जातात आणि पिंजरा एकचा दरवाजा पुन्हा उघडला जातो. दुसऱ्या पिंजऱ्यातील बंदिस्त वानर रॅम्प पिंजऱ्याच्या साह्याने बोलेरो पिकअपमधील पिंजऱ्यामध्ये घेतले जाते. या प्रकारे एक-एक वानर, माकड बंदिस्त केले जाते. जमिनीवरील दोन्ही पिंजरे फोल्डींग पद्धतीने तयार केलेले आहेत.www.konkantoday.com