देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणार!संपूर्ण रस्त्याला सील कोटही टाकण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन


गाव विकास समिती संघटनेच्या रस्ता दुरुस्ती बाबतच्या जवाब दो धरणे आंदोलनाला यश, गॅरंटी अंतर्गत दुरुस्तीचे काम होणार

देवरुख:-देवरुख – संगमेश्वर – साखरपा रस्त्याची झालेली दुरवस्था गॅरेंटी अंतर्गत दुरुस्त करून द्यावी व संपूर्ण रस्त्याला सील कोट मारावा या मागणीसाठी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत साडवली येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पूजा इंगवले मॅडम यांनी भेट देऊन गाव विकास समितीच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र दिले.

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर व ऍड. सुनील खंडागळे यांच्या उपस्थितीत संगमेश्वर साखरपा देवरुख रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जवाब दो धरणे आंदोलन पार पडले. रस्त्याला 5 वर्षाची हमी असताना अवघ्या तीन वर्षांत रस्ता खराब कसा झाला? असा सवाल करत गाव विकास समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत आंदोलन स्थळी भेट दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख विभाग उपअभियंता पूजा इंगवले मॅडम यांनी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की,निविदा शर्तीनुसार सदर कामाचे दोष व दायित्व कालावधी ही ५ वर्षाची असून सदरचे काम हे मार्च २०२२ ला पूर्ण करण्यात आले आहे. सदरचे काम हे दोष व दायित्व कालावधीत असल्याने सदर कामाची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे.
रस्ता दुरुस्ती बाबत ठेकेदाराला सूचना देण्यात येतील.सदर दुरुस्तीचे काम १ फेब्रुवारी पासून चालू करण्यात येईल तसेच सील कोटचे काम मार्च अखरे पर्यंत करणेत येईल असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष भोपळकर यांना दिले आहे. जमावबंदीच्या आदेशाचे पालन करत निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अनेक नागरिकांनी भेटी दिल्या. त्याचबरोबर गाव विकास समितीचे पदाधिकारी सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, सुरेंद्र काबदुले, महिला संघटना अध्यक्षा दीक्षा खंडागळे, महिला संघटना सरचिटणीस ईश्वरी यादव, जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी,जिल्हा संघटक, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष दैवत पवार यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देत भोपळकर यांना समर्थन दिले.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button