कीर्तनसंध्या महोत्सव आता ९ मार्चपासून
रत्नागिरी : अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव आता ९ मार्च ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. पूर्वनियोजनानुसार हा महोत्सव १० जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होणार होता; मात्र नऊ जानेवारी २०२४ रोजी पहाटे अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे हा महोत्सव अगोदर एक दिवस पुढे ढकलण्यात आला; मात्र पावसाळी वातावरण कायम राहिल्याने महोत्सव स्थगितच करावा लागला. आता हा महोत्सव ९ मार्च ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार असल्याचे कीर्तनसंध्या परिवाराकडून कळवण्यात आले आहे.
‘कीर्तनसंध्या महोत्सवाला दर वर्षीच रसिक श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. म्हणूनच हा कार्यक्रम खुल्या मैदानात आयोजित केला जातो; मात्र ऐन वेळी उद्भवलेल्या पावसाळी स्थितीच्या अनिश्चिततेत एवढा भव्य कार्यक्रम खुल्या मैदानात घेणे शक्य नव्हते. महोत्सवाचे स्वरूप भव्य असल्याने प्रत्यक्ष मैदानावरच्या तयारीलाच किमान दोन-तीन दिवस लागतात. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन महोत्सव पुढे ढकलण्यात आला. आधी ठरवल्याप्रमाणे भव्य-दिव्य स्वरूपातच महोत्सव होणार आहे; मात्र आता तो ९ मार्च ते १३ मार्च या कालावधीत होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांची उपलब्धता, तसेच मैदान आणि तंत्रज्ञांची उपलब्धता यांचा विचार करून वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेच रसिकांचा उदंड प्रतिसाद याही वेळी मिळेल, याची आम्हाला खात्री आहे,’ असे कीर्तनसंध्या परिवाराने म्हटले आहे.
ज्यांनी आधी देणगी सन्मानिका घेतल्या आहेत त्या सन्मानिका ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यामुळे त्या जपून ठेवाव्यात, तसेच देणगीच्या पावत्याही जपून ठेवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महोत्सवाची वेळ आणि ठिकाण यात बदल झालेला नाही. आठवडा बाजारातील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात दररोज सायंकाळी सहा ते रात्री १० या वेळेत महोत्सव होणार आहे.
www.konkantoday.com