राजापूरची सुकन्या आदिती पड्यार बनली मेट्रो चालक
मुळचे राजापूर तालुक्यातील आडवली गावातील पड्यार कुटुंब नोकरी व्यवसायानिमित्राने दिवा येथे स्थायिक झाले. आदिती हिची आई गृहिणी आहे तर वडील खाजगी नोकरी करतात. आदिती हिने दिवा हायस्कूल येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इयत्ता दहावीनंतर डी. वाय. पाटील महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर तिने डोंबिवली येथील शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयातून ३ इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयातील डिग्री संपादन केली आहे. त्यानंतर तिला मुंबई येथील मोनोरेलमध्ये ट्रेन कॅप्टन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मोनोरेलमधील २ वर्षांच्या अनुभवानंतर आता आदिती पड्यार मेट्रो चालक बनली आहे. नवी मुंबई येथे सुरू झालेल्या मेट्रोच्या शुभारंभाची ट्रेन चालवण्याचा मोठा बहुमान या कोकण कन्येला मिळाला आहे. नवी मुंबई येथे शुभारंभ दिवशी त्यांनी २२ किलोमीटरची पॅसेंजर ट्रेन चालविली.
www.konkantoday.com