ऐन दिवाळीत शीळ गावातील वीज गायब
राजापूर: दिवाळी हा दिव्यांचा उत्सव, मात्र ऐन दिवाळीत अंधारात चाचपडण्याची नामुष्की महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे राजापूर शहरानजीकच्या शीळ गावातील ग्रामस्थांवर आली आहे. गेली अनेक वर्षे नादुरूस्त असलेला शीळ गोंडाळवाडी येथील टॉन्स्फार्मर दिवाळीच्या पूर्वसंध्येला निकामी झाला व शीळ गावातील निम्मा गाव अंधारात बुडाला. विजेअभावी पहिल्या आघोळीला ग्रामस्थांना पाण्यासाठी भल्या पहाटे हंडा खांद्यावर घ्यावा लागला. ऐन दिवाळीत आलेल्या या संकटामुळे महावितरणने आपले अपयश झाकण्यासाठी तत्काळ रत्नागिरीहून पर्यायी ट्रॉन्स्फार्मर आणून बसवला. मात्र गुरूवारी तो ही निकामी झाल्याने पुन्हा एकदा ऐन दिवाळीत शीळवासियांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे. १२००च्या दरम्यान लोकवस्ती असलेला शीळ गावात महावितरणने २ टॉन्सफार्मर बसवले आहेत. तेही जेमतेम अश्वशक्तीचे असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज़पुरवठा होणे, लाईन ट्रीप होणे असे प्रकार सातत्याने सुरू होते. या बाबत स्थानिक ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीने अनेकदा नवीन टॉन्स्फार्मर बसवण्यासाठी अर्ज, निवेदने दिली, मात्र महावितरणकडून ठोस उपाययोजना न होता वारंवार
काही तांत्रिक कारणे सांगून ग्रामस्थांसह वीजग्राहकांना आशेवर ठेवले. विजेअभावी पाण्याचे पंप, पिठाची गिरणी बंद पडल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
www.konkantoday.com