
दावोस दौरा सोडून उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईत; ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का, उद्यापासून कोकणातून सुरुवात
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे गुरूवारी दावोस दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. मुंबईत पाऊल ठेवताच त्यांनी राजकीय धमाक्याचे संकेत दिले. त्याची सुरूवात शुक्रवारी रत्नागिरीतून होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेसामंत यांनी ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देण्याबाबत भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच सामंत यांनी आजी-माजी आमदार, खासदारांचा आकडा सांगत ठाकरेंना हे प्रवेश रोखून दाखवण्याचे आव्हानही दिले आहे.
मुंबई विमानतळावर मीडियाशी बोलताना सामंत म्हणाले, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच उबाठाला खिंडार पडायला सुरूवात होत आहे. त्याचा पहिला ट्रेलर रत्नागिरीत पाहायला मिळेल. चार उबाठाचे आणि पाच काँग्रेसचे आमदार, तीन उबाठाचे खासदार, दहा माजी आमदार आणि असंख्य पदाधिकारी शिवसेनेत सामील होत आहेत.उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश आहेत. तिथे काही माजी आमदार उबाठा सोडून शिवसेनेत येणार आहेत. रत्नागिरीतून कोल्हापूरमार्गे सांगलीत येणार आहे. सांगलीतून साताऱ्यात आणि साताऱ्यातून पुण्यात येणार आहे. हा पहिला टप्पा आहे, असे सांगत त्यांनी कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही ठाकरेंना धक्का देणार असल्याचे स्पष्ट केले.