सीईओंच्या खुर्चीवरील फोटोशूट शिक्षिकेला भोवणार?
जिल्हा परिषदेमध्ये सध्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या खुर्चीचा विषय चर्चेत आहे. इस्रो व नासाला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद भवनात बोलावण्यात आले होते. मात्र यावेळी उपस्थित एक शिक्षिका हॉलमधील मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या खुर्चीवर जाऊन बसली. यानंतर तिने काही फोटोही काढले. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्याने जिल्हा परिषद भवनात खळबळ उडाली होती.
या वृत्ताची मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी त्वरित दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी सोमवारी (दि.६) घडलेल्या प्रकाराच्या दिवशी जे-जे शिक्षक उपस्थित होते त्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित शिक्षिकेने आपण फोटो काढल्याचे कबूल केले. मात्र नकळत आपल्या हातून चूक घडल्याची कबुली तिने यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासमोर दिली. मात्र सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीसाठी बाहेर असल्याने कारवाई काय करण्यात यावी, यावर काहीच निर्णय झाला नाही.
यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी हे या संबंधित शिक्षिकेवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. वास्तविक या शिक्षिकेवर शिस्तभंगाची कारवाई करून किमान एक वेतनश्रेणी रोखावी, अशी अनेकांकडून मागणी होत आहे
www.konkantoday.com