शहराला पाणी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून सत्कार
काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली आणि ऐन गणपतीत नागरिकांसमोर पाणी संकट उभे राहिले. घरात गणपती असताना देखील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करत 48 तासात शहराला पाणी दिले. त्यांच्या या कार्याची रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने दखल घेत या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा नगरपालिकेत आयोजित करण्यात आला होता. पाणी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यापारी महासंघाकडून नवीन कपडे शिवण्यात आले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगरसेवक निमेश नायर, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, तालुकाध्यक्ष निखील देसाई, नगरपालिका अधिकारी भोईर, माने व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भर पावसात भिजत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल आज रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने घेतली आहे त्यांचे देखील मी आभार मानतो असे माजी नगरसेवक निमेश नायर यावेळी म्हणाले.
www.konkantoday.com