चिपळूण शहरातील मिळणार्या वाढत्या अंमली पदार्थांबाबत पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांची नाराजी
अंमली पदार्थ सेवन करण्याच्या घटना वाढत असताना त्यापटीत पोलिसांकडून असे पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. मुळातच अंमली पदार्थ शहरात येतात कसे, शिवाय अशा पदार्थांची सर्रास विक्री होत असताना याची कल्पना पोलिसाना असते, असा प्रश्न उपस्थित करत शुक्रवारी आयोजित सर्वपक्षीय सामाजिक संस्था यांच्या तातडीच्या बैठकीत पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील एका इमारतीमध्ये चौघा तरूणांना गांजा सेवन करताना नागरिकांनी पकडून दिल्याच्या घटनेनंतर अंमली पदार्थ तालुक्यातून हद्दपार व्हावेत यासाठी शुक्रवारी लोटीस्माच्या सभागृहात सर्व पक्षीय, सामाजिक संस्था याची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीदरम्यान, अंमली पदार्थांच्या विळख्यात चिपळूण सापडले असून युवा पिढी याच्या आहारी गेली आहे. यात प्रामुख्याने महाविद्यालयीन तर काही अल्पवयीन तरूणांचा समावेश आहे. हा प्रकार गंभीर असताना पोलीस मात्र त्यापटीत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत नाही. मुळातच अंमली पदार्थांसह गांजा सारखेच नशा येणारे पदार्थ चिपळूण शहरात येतातच कसे याची कल्पना या यंत्रणेला माहित असून या यंत्रणेचे त्या विक्रेत्यांशी धागेदोरे असतात. गांजा सेवन करणार्यांवर कारवाई करताना हा गांजा कोठून आणला गेला त्याच्या मुळाशी पोलीस जाताना दिसत नाहीत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. www.konkantoday.com