
नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस संगमेश्वर थांबा मिळवण्यासाठी स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी !आमरण उपोषण…संदेश जिमन
संगमेश्वर (प्रतिनिधी) कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी केलेल्या आंदोलनानंतर त्याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने सहा महिने झाले तरी आपला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते पुन्हा एकदा येत्या स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत.
यंदा २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी बेमुदत उपोषण केले होते. संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामध्ये नेत्रावती व मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. यावेळी संगमेश्वरवासीय भूमिपुत्र, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रिंट व डीजिटल मीडियातील पत्रकार आदींनी त्यात सहभाग घेतला होता.
सर्व प्रसारमाध्यमांनी या उपोषणाची नोंद घेतली होती. जनतेनेही भरघोस पाठिंबा दिला होता.
हे उपोषण आंदोलन २६ आणि २७ जानेवारी २०२२ या दोन दिवसात झाल्याने ते चांगलेच गाजले.
अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी आंदोलकांना भेट देऊन पाठिंबा दर्शविला होता.
कोकण रेल्वेचे रिजनल मॅनेजर रवींद्र कांबळे यांनी ‘या प्रश्नावर आम्ही सकारात्मक विचार रेल्वे बोर्डस कडे दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवू ‘ असे आश्वासन दिले होते. शिवाय अनेक राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी केलेल्या आवाहनाचा मान राखून आंदोलनकर्त्यांनी दोन दिवस चाललेले उपोषण आंदोलन मागे घेतले होते. परंतु त्यानंतर ५-६ महिन्यात कोकण रेल्वेने कोणतीही सकारात्मक कृती केल्याचे दिसले नाही.
‘आमचा पाठपुरावा चालू आहेच, पण कोकण रेल्वेकडून अजून कोणतेही उत्तर आलेले नाही. यासाठी संगमेश्वरवासीय भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हे संविधानीय हत्यार आम्ही उपसत आहोत. मात्र आता हे आमरण उपोषण असेल.’ असा इशारा आंदोलकांच्या वतीने समूह प्रमुख आणि पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते संदेश जिमन यांनी दिला आहे.
‘हे उपोषण येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक परिसरात, सकाळी १० वाजता उपोषण आंदोलनाला प्रारंभ होईल. यावेळी करोना संदर्भात सर्व सरकारी नियम पाळले जातील आणि कायदा व सुव्यवस्थेला बांधील राहून स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेत अतिशय शांततापूर्ण मार्गाने उपोषण आंदोलन करण्यात येईल,असेही निसर्गरम्य संगमेश्वर व निसर्गरम्य चिपळूण फेसबुक समूहाचे प्रमुख संदेश जिमन यांनी सांगितले. तसे पत्र आज रत्नागिरी येथे जाऊन रिजनल रेल्वे मॅनेजर रविंद्र कांबळे यांना दिले तेव्हा तेव्हा ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन संजय मालप संतोष पाटणे सुशांत शेठ कोळवणकर गुरुप्रसाद भिंगार्डे ,ओंकार लोध ,अमोल शेट्ये ,संतोष खातू ,स्वप्नील नारकर विशेष सहकार्य दीपक पवार जगदीश कदम गणपत दाभोलकर नरेंद्र खानविलकर मुकुंद सनगरे संजय म्हपुस्कर प्रसाद नागवेकर वसंत घडशी शांताराम टोपरे आदीजण उपस्थित होते
www.konkantoday.com