
तीन हजार कंत्राटी पोलिसांच्या भरतीला मंजुरी,चार विभागांतील ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर
कंत्राटी भरतीवरुन विरोधकांनी रान उठवलेलं असतानाही सरकारने अनेक विभागांमध्ये कंत्राटी भरती सुरु करण्यात आलीय. याअंतर्गत मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर तीन हजार मनुष्यबळ भरण्याच्या निर्णयाला गुरुवारी (ता.१२) मान्यता देण्यात आली.
राज्य सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. पोलिस दलाचे खासगीकरण करण्याचे हे पाऊल असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मुंबई पोलिसांमध्ये ११ महिन्यांच्या कालावधीसाठी ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय अमलात येणार आहे. मुंबई पोलिस दलात १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज लागते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे गृहविभागाकडून सांगण्यात आले. २७ जुलै २०२३ रोजी हा आदेश काढण्यात आला होता. त्याला मान्यता दिली आहे. याअंतर्गत गृहविभाग महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाला दरमहा आठ कोटी ३५ लाख १२ हजार रुपये देणार आहे. वर्षभरासाठी १०० कोटींहून अधिक रक्कम अदा केली जाणार आहे.
राज्य सरकारने सेवापुरवठादार संस्थांची निवड करून बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्यापासून भरतीचा धडाका सुरू केला आहे.आतापर्यंत चार विभागांतील ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर झाले असून, नोव्हेंबपर्यंत याच पद्धतीने एक लाख पदे भरण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
राज्य सरकार वर्ग २, ३ आणि ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. राज्यातील तरुणाई या निर्णयाचा तीव्र विरोध करत असून, शासन निर्णयांची होळी केली जात आहे. मात्र, तरुणांमधील या असंतोषानंतरही कंत्राटी भरतीचा धडाका सुरूच आहे.
www.konkantoday.com