रत्नागिरी शहरातील 70 मोकाट गुरांची रवानगी निवारा शेडमध्ये
रत्नागिरी शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याच्या पालीकेच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरामध्ये पकडलेली गुरे उद्यमनगर येथील चंपक मैदानावर केलेल्या निवारा शेडमध्ये नेण्यात येत आहेत. आतापर्यंत ७० गुरांना डांबण्यात पालिकेच्या पथकाला यश आले आहे. येत्या काही दिवसात शहर मोकाट गुरे मुक्त होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. विरोधकांनीही हा प्रश्न उचलून धरला होता. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने जिल्हाप्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानंतर मोकाट गुरांना पकडून चंपक मैदानावरील निवारा शेडमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये शहरातील गुरे चंपक मैदानावर नेण्यात येत आहेत. या धरपकड मोहिमेसाठी १५ जणांचे पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com