जि.प. पदांसाठी परीक्षेच्या तारखा निश्चित
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या १८ पदांच्या ७१५ जागांसाठी तब्बल ७० हजार ६०८ उमेदवारांचे अर्ज सादर झालेले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी ४१ हजार इतक्या सर्वाधिक अर्जांचा समावेश आहे. या भरतीसाठी येत्या ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यातील ग्रामसेवक पदासाठी परीक्षेची तारीख न ठरल्याने उमेदवारांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत ७१५ रिक्त जागांची भरती करण्याची जबाबदारी शासनाने खाजगी कंपनीकडे सोपविलेली आहे. या रिक्त ७१५ जागांसाठी तब्बल ७०,६०८ इतके अर्ज दाखल झाले आहेत. या इच्छूक उमेदवारांनी परीक्षा फी पोटी तब्बल ६ कोटी रुपये भरले पण ते शासनाच्या तिजोरीत जमा न होता भरती प्रक्रियेची जबाबदारी सोपविलेल्या खाजकी कंपनीच्या खिशात पडले आहेत.
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत. त्या दिलेल्या मुदतीअखेर ७० हजार ६०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ग्रामसेवक पद सोडून इतर पदांसाठी ३ ते ११ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान परीक्षा होणार आहे. ग्रामसेवक पदासाठी अर्ज जास्त असल्यामुे या परीक्षेची तारीख अजुनही निश्चित करण्यात आलेली नाही.
www.konkantoday.com