
नको ओवाळणी, खाऊ, जुनी पेन्शन पाहिजे, ती द्या एकनाथ भाऊ….!मुख्यमंत्र्यांना साद ; भगिनींनी पाठवल्या १५० राख्या
रत्नागिरी, – जुन्या पेन्शनसाठी राज्यभरात विविध ठिकाणी संघटना प्रयत्न करत आहेत. आता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या रत्नागिरी तालुका शाखेच्या भगिनींनी चक्क मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या असून, त्यासोबत जुन्या पेन्शनसाठी साद घातली आहे. एकनाथ भाऊ नको ओवाळणी, खाऊ, जुनी पेन्शन पाहिजे, ती द्या एकनाथ भाऊ….! अशी मागणी केली आहे.
पेन्शन फायटर भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५० राख्या पाठवल्या. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी यासाठी पत्र व राखी पाठवून भावनिक साद घालण्यात आली. साद आपल्या बहिणीची, एक राखी पेन्शनची, एकनाथ भाऊंनी करावी मागणी पूर्ण, होईल उद्धार कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रातील संपूर्ण, रक्षाबंधनाची हीच खरी ओवाळणी, नाथा भाऊराया बहीण तुझी करते ही आळवणी, असे पत्र राखीसोबत जोडले आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा महिला आघाडीप्रमुख विभा बाणे, पेन्शन फायटर वृषाली हेळेकर, अपर्णा राऊत, अनुराधा सागवेकर, स्वरा चव्हाण, नयना महाडेश्वर यांनी विशेष असे परिश्रम घेतले. त्यांना रत्नागिरी तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार, तालुकानेते शिवाजी घुटे, तालुका उपाध्यक्ष अवधूत शिंदे, तालुका कोषाध्यक्ष रामनाथ बने, तालुका प्रसिद्धीप्रमुख सुजित वाफेलकर, तालुका संघटक नवनाथ कुटे यांनी विशेष सहकार्य केले.
www.konkantoday.com