परशुराम घाटात चौपदरीकरणाचा वेग मंदावला
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मे महिनाअखेर घाटातील एक मार्गिका तरी सुरू करण्याचा निर्धार महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीने केला आहे. मात्र आतापर्यंत जे काम झाले आहे ते पाहता ठेकेदाराने कितीही ताकद लावली तरीही मे २०२३ अखेर घाटाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत चार अवघड घाट येतात. यामध्ये कशेडी, भोस्ते, परशुराम आणि कामथे या घाटांचा समावेश आहे. महामार्गावरील या अवघड घाटात होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान, रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणार्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्ग बांधला जात असून त्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कशेडी घाटाचा प्रश्न मार्गी लागणा आहे.
खेड तालुक्यातील भोस्ते आणि चिपळुण तालुक्यातील कामथे या दोन्ही अवघड घाटांच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कशेडी, भोस्ते आणि कामथे या तिन्ही घाटातील अपघातांचा धोका कमी झाला आहे. मात्र परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम वेळेत सुरू न झाल्याने या घाटाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण नसून अपघातांचा धोका कायम आहे.
www.konkantoday.com