आमदार शेखर निकम यांनी वेधले स्थानिक शिक्षक भरतीकडे लक्ष; शिक्षणमंत्री केसरकरांचे विभागस्तरीय भरतीचे आश्वासन

रत्नागिरी : जिल्हा निवड मंडळाद्वारे होणारी शिक्षक भरती राज्याच्या स्तरावर नेऊन ठेवली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला. यात स्थानिक तरूण तर कोसो दूर फेकले गेले आणि परजिल्ह्यातून येणारे उमेदवार काही वर्षे वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात जाऊ लागले. त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकवायचे कोणी? हा प्रश्न मागील दहा वर्षात कोकणातील रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत निर्माण झाला. कोकणासह नाशिक, कोल्हापूर विभागातही हीच स्थिती आहे. ही बाब विचारात घेऊन आमदार शेखर निकम यांनी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी अधिवेशनात केली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या मागणीचे समर्थन करत विभाग स्तरावर भरती करण्याचे आश्वासन दिल्याने या निर्णयाचे भावी शिक्षकांतून स्वागत केले जात आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चिपळूण-संगमेश्वरचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी स्थानिक शिक्षक भरतीसंदर्भात मुद्दा उपस्थित केला. शिक्षक भरतीसंदर्भात अध्यक्ष, सभागृह व संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी संबंधितांनी आ. निकम यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना योग्य ती दखल घेऊन त्यासाठी आवश्यक असणार्‍या नियमांचे नियोजन व अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात कोकणातील शिक्षक बदलीबाबत संबंधितांचे लक्ष वेधले. 2010 नंतर 2017 ला शिक्षक भरतीसाठी परीक्षा झाली. मात्र त्यात स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. ही भरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यातच मागील 10 वर्षात सातत्याने जिल्हा बदली होत आहे. परजिल्ह्यातील शिक्षक कोकणात येतात, आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. नवीन भरती लगेचच होत नाही. त्यामुळे कोकणातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा बदलीची समस्या थांबवायची असेल, तर शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी आग्रही मागणी आमदार निकम यांनी केली. यावर सविस्तर मुद्दे मांडताना आ. निकम म्हणाले, कोकणातील शाळा या दुर्गम व डोंगराळ भागातील आहेत. त्यामुळे येथे अन्य ठिकाणाहून शिक्षक येण्यास तयार होत नाहीत. तसेच अन्य जिल्ह्यातून आलेले शिक्षक आंतरजिल्हा बदलीचा उपयोग करीत पुन्हा आपापल्या गावी बदली करून घेत आहेत. आजच्याघडीला रत्नागिरी जिल्ह्यातील 440 शिक्षक बदलीवर गेले आहेत. या ठिकाणी नव्याने शिक्षक येत नाहीत. त्यामुळे यावेळेची शिक्षक भरती स्थानिक पातळीवर व्हावी. ज्या जुन्या शाळांना अनेक वर्षे झाली आहेत, त्या विना अनुदान तत्त्वावर सुरू आहेत. त्यामुळे अनुदान देण्याचा विचार करताना अशा जुन्या शाळांचा विचार केला जावा, अशी आग्रही मागणी केली.
स्थानिक शिक्षक भरती या विषयाबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी या पुढील भरती करताना विभागीय स्तरावर करण्याबाबत नियोजन केले आहे. तसेच विभागीय स्तरावर भरती झालेल्या शिक्षकांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी काम करणे बंधनकारक ठेवले जाणार आहे. याबाबत नियम व नियोजन सुरू असल्याची माहिती देऊन कमी शिक्षक असलेल्या ठिकाणचा कोटा ठरविण्याच्या सवलतीचेही नियोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.
मागील दहा वर्षांपासून कोकणातील स्थानिक तरूण ‘विभागीय स्तरावर शिक्षक भरती करावी’, अशी मागणी करत आहेत. यासाठी 10 ते 12 वर्षांपासून आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली जात आहे. मात्र या प्रश्नाकडे आता आ. निकम यांनी लक्ष वेधल्याने व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समर्थन दर्शवल्याने कोकणातील डीएड्, बीएड् धारकांतून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय काढावा, अशी मागणी कोकण डीएड्, बीएड् धारक संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर व सचिव संदेश रावणंग यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button