भावकीतील मुलाशी लग्न केले म्हणून 6 वर्षे टाकले वाळीत
राजापूर : भावकीतील मुलाशी लग्न केले म्हणून गेली 6 वर्षे वाडीतील ग्रामस्थांनी मला व माझ्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला असल्याची तक्रार राजापूर तालुक्यातील जुवाठी बौध्दवाडीतील महिला अल्पिता कांबळे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात केली आहे. आमचा वाडीतील लोकांशी कोणताही तंटा नाही. परंतु भावकीतील मुलाशी लग्न केले हा राग धरून आमच्या कुटुंबावर गेली 6 वर्षे सामाजिक बहिष्कार टाकला आहे. वाडीतील लोक सामाजिक भेदभाव करीत आम्हाला त्रास देत आहेत. मी व माझा पती यांनी अनेकवेळा वाडीतील लोकांना आमच्याशी काय असे वागता? असे विचारले असता आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवायचे नाही.तुमच्यावर आम्ही बहिष्कार टाकला आहे. तुम्हाला वाडीच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेणार नाही, असे सांगितले जाते. असे तकारीत नमूद केले आहे. वाडीतील नागरिकांच्या विरोधात अल्पिता कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे.