लांजातील देवधेचा निकाल प्रलंबित; आ. साळवी निकालापर्यंत थांबले कार्यकर्त्यांसोबत
लांजा : तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत देवधे ग्रामपंचायतीचा निर्णय रात्री उशिरापर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी पाच तास तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. तहसीलदार ऑफिसच्या लाकडी बाकावर कार्यकर्त्यांसह आ. साळवी बसून राहिले. अखेर सायंकाळी सात वाजता तहसीलदार प्रमोद कदम यांनी हा निर्णय तात्पुरता स्थगित केल्याचे जाहीर केले.
शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालेला असतानाही तो निर्णय निवडणूक यंत्रणा घोषित करीत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दहा मतांचा फरक कशामुळे पडला आहे, ही बाबच अद्याप गुलदस्त्यात आहे. ईव्हीएममशीन मधील तांत्रिक बिघाड झाल्यानेच हा फरक झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाची असलेली देवधे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजप प्रणित अजय गुरव या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवाराला जोरदार लढत दिली. शिवसेना उमेदवार हरमले आणि भाजपचे अजय गुरव यांच्यात अवघ्या दहा मतांचा फरक आहे.
मतदान यंत्रातील एकूण आकडेवारीमध्ये 10 मतांचा फरक कशामुळे पडला, हे शेवटपर्यंत निश्चित झालेले नाही. यामुळे तहसीलदार प्रमोद कदम यांनीही यावर निश्चित निर्णय घेता येत नसल्याचे सांगितले.