रत्नागिरी जिल्ह्यातील 2 लाख 93 हजार 359 बालकांना देणार जंतनाशक गोळी
रत्नागिरी : जिल्ह्यातील पौगंडावस्थेतील मुला-मुलींना 10 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. शाळा, अंगणवाडी, शिक्षण संस्थांसह समुदायस्तरावर घरोघरी जाऊन 2 लाख 93 हजार 359 लाभार्थींना याचे वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणार्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेतील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच 10 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम आणि 17 डिसेंबर रोजी मॉप अॅप दिन राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. परिक्षित यादव यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, जिल्हा माध्यम अधिकारी प्रभाकर कांबळे आदी उपस्थित होते.
ग्रामीण आणि शहरी लाभार्थिंनी मोहिमेत आपल्या 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळीचा लाभ दिला जाणार आहे. या मोहिमेमुळे मुला-मुलींचे शारीरिक मानसिक व बौध्दिक विकास होण्यास मदत होते. 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी नियोजन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र 378, शाळा 3151 आणि अंगणवाडी 2261 अशा एकूण 6 हजार 467 संस्थांमध्ये समुदायस्तरावर घरोघरी जाऊन आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 लाख 93 हजार 359 लाभार्थींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाईल.