चिखलगाव-जड्यारवाडी येथील शेतकर्‍यांच्या जमिनीत अतिक्रमण झाल्याने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

राजापूर : तालुक्यातील चिखलगाव जड्यारवाडी येथे लघु पाटबंधारे विभागातर्फे मंजूर करण्यात आलेल्या लघु पाटबंधारे धरण प्रकल्पासाठी ओणी कोंडवाडी आणि सौंदळ येथील शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आलेला नाही. असे असूनही या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून या प्रकरणी सखोल चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ओणी येथील सामाजिक कार्यकर्ते अमर वारीशे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील चिखलगाव जड्यारवाडी धरणाचे काम लघु पाटबंधारे विभागामार्फत 2013 पासून चालू करण्यात आले. हा प्रकल्प चिखलगाव, सौंदळ ओणी कोंडवाडी या तीन गावांच्या हद्दीवर आहे. परंतु, संबंधित विभागाने चिखलगाव या परिसरात काम सुरू झाले असले तरी, सौंदळ आणि ओणी कोंडवाडी येथील शेतकर्‍यांना काम करताना विश्वासात घेतलेले नाही किंवा कोणतीही कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली नाही.
संबंधित विभागाने धरणाचे काम सुरू केले आणि काम करत असताना सौंदळ, ओणी कोंडवाडी गावातील शेतकर्‍यांच्या जमिनीत रात्रीच्यावेळी खोदकाम केले. ही गोष्ट आम्हा शेतकर्‍यांच्या लक्षात आल्यावर काम थांबवले. याबाबत, जिल्हाधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार केल्यानंतर नजरचुकीने हे खोदकाम झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
वास्तविक कोंडवाडी आणि सौंदळ येथील जमिनी संपादीत केल्या नसताना हे धरणाचे काम कसे काय सुरू करण्यात आले? असा सवाल  वारीशे यांनी विचारला आहे. धरणात जमीन जाणार आणि त्याचा मोबदला मिळणार म्हणून शेतकर्‍यांनी येथील शेती सोडून दिली. तर, पैसे न मिळाल्याने घराघरात आणि भावाभावात वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी होऊन संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वारीशे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button