जिल्ह्यातील 52 एसटी कर्मचार्यांचा करार संपुष्टात
रत्नागिरी : एसटी कर्मचार्यांच्या संपाच्यावेळी एसटी महामंडळाने करार पध्दतीने राज्यात 800 चालक -वाहकांची नियुक्ती केली होती. यामध्ये जिल्ह्यातील 52 कर्मचार्यांचा समावेश होता. शासनाने 2 सप्टेंबरला हा करार संपुष्टात आणला. जादा चालक, वाहकांची गरज नसल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांच्या व महामंडळाच्या गरजेच्यावेळी धावून आलेल्या 52 कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास 5 महिने संप केला होता. एसटीचा हा ऐतिहासिक संप ठरला. त्यानंतर तत्कालीन सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. ठाकरे सरकारने विलिनीकरणाची मागणी वगळता उर्वरित मागण्या मान्य करत एसटी कर्मचार्यांची भरघोस वेतनवाढ दिली होती. एसटी कर्मचार्यांच्या संपाच्यावेळी एसटी महामंडळाने करार पध्दतीने 800 कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. ते करारही 2 तारखेला संपवले गेले आहेत. आता जादा चालक, वाहक यांची गरज नसल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या 800 कर्मचार्यांना कामावरून काढू नये, अशी मागणी काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.