राजापूर पोलिस ठाण्याबाहेर रिफायनरी समर्थकांची घोषणाबाजी; ना. सामंतांना धमकी देणार्याला अटक करण्याची मागणी
राजापूर : बारसू-धोपेश्वर येथील रिफायनरी प्रकल्पावरून मंगळवारी (दि. 13 सप्टेंबर) रिफायनरी समर्थकही आक्रमक झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या नरेंद्र जोशींना तत्काळ अटक करा, अशी मागणी करीत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा घोषणा राजापूर पोलिस ठाण्याबाहेर देण्यात आल्या. प्रकल्पाविरोधात स्थानिक जनतेची माथी भडकाविण्यासाठी येणार्या कथित एनजीओंवरही कारवाई करा, अशी मागणी रिफायनरी समर्थकांनी केली. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील गोवळ गावचे नरेंद्र जोशी यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात धमकी देणारी टीका केली. शिवराळ भाषेत मंत्री सामंत यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले होते. संतप्त सामंत समर्थकांनी नरेंद्र जोशी यांना गाठून हिसका दाखविला. त्यानंतर प्रकल्प समर्थकांनी राजापूर पोलिस ठाण्यासमोर जमून ठिय्या मांडला होता. नरेंद्र जोशींना मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी विरोधकांनी मागणी केली. उद्योगमंत्री सामंत यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या नरेंद्र जोशी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समर्थकांतून लावून धरण्यात आली होती.रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच झाला पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.