
चतुर्दशीनंतर होणार राज्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या : ना. सामंत
रत्नागिरी : कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हे आगामी आठ दिवसांत कळेल, असे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्र्यांचा विस्तार कधी होणार, याचेही संकेत दिले. आठ दिवसांत म्हणजे अनंत चतुर्दशीनंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील, असे ना. सामंत म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत गणेशोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील अनेक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्याही घरी जाऊन गणपतींचे दर्शन घेतले. त्यामुळे त्यांचा गेल्या वर्षभरात तिसरा जनसंपर्क दौरा झाला आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सदस्यांचा कालावधी संपण्यापूर्वी आणि कालावधी संपल्यानंतर ना. उदय सामंत यांनी प्रभाग, गण, गटनिहाय बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी झालेल्या विकासकामांची माहिती दिली.