चिपळूणची पूरस्थिती : मोडक समितीचा अंतिम अहवाल शासनाला सादर करणार
चिपळूण : चिपळूणच्या पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने मोडक समिती अभ्यास गट स्थापन केला. या समितीच्यावतीने चार बैठका घेण्यात आल्या. आता ही समिती अंतिम अहवालावर आली असून लवकरच मोडक समितीचा अहवाल शासनाला सादर होणार आहे.
गतवर्षी चिपळूणमध्ये महापूर आल्याने कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले तर काहींचे बळी गेले. अतिवृष्टी आणि वीजनिर्मिती करून सोडण्यात आलेले पाणी यामुळे चिपळुणातील पुराची तीव्रता वाढली, असा आरोप नागरिकांच्यातर्फे करण्यात आला. अखेर याची दखल घेत शासनाने कोयना जलविद्युत केंद्राचे माजी मुख्य अभियंता डॉ. दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला व या अभ्यास गटाला तीन महिन्यांची मुदत देऊन आपला अहवाल राज्य शासनाला सादर करण्याची अधिसूचना काढली. त्यानुसार डॉ. दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली पोफळी येथील महाजनको कार्यालयात चार बैठका झाल्या. महाजनकोचे अधिकारी, कोयना प्रकल्पातील अधिकारी, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन, जलसंपदा विभाग, महसूल विभाग, तसेच स्थानिक म्हणून संजीव अणेराव, डॉ. पाटणकर, सतीश कदम, किशोर रेडीज आदींचा यामध्ये सहभाग होता. या अभ्यास गटाच्या पोफळी येथे चार बैठका यशस्वी झाल्या व बैठकीत वेळोवेळी सूचविलेल्या सूचनांप्रमाणे अभ्यास करण्यात आला. वाशिष्ठी पात्रातील पाण्यावर अतिवृष्टी आणि कोयनेचे अवजल याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास या अभ्यासगटाने केला आहे. या बाबतचा सविस्तर अहवाल लवकरच शासनाला सादर होणार आहे.