
चिपळुणात महामार्गाच्या खोदकामादरम्यान पाईपलाईन तुटल्याने गैरसोय
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदकामादरम्यान पाईपलाईन तुटल्याने शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी चिपळूण शहरातील संबंधित भागाचा पाणीपुरवठा खंडीत झाला. या परिसरातील चौपदरीकरणामुळे टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जुन्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उड्डाणपुलाचे पिलर टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. महामार्गाच्या बाजूला असलेल्या यु. इं. स्कूलसमोर विरेश्वर कॉलनी, रॉयलनगर, प्रांत ऑफिस समोरील भागात हा प्रकार घडला. कामादरम्यान येथील वाहिनी फुटल्याने परिसरातील नागरी वस्तीतील पाणीपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे न.प.ला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.