आपला इतिहास माहिती हवा म्हणून ‘१९४२ चिपळूण’ची निर्मिती- आमदार शेखर निकम
चिपळूण :: भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं आहे. कष्ट भोगलेले आहेत. आपल्या भूमीचा हा इतिहास आपल्याला माहिती हवा म्हणून ‘१९४२ चिपळूण’ या उत्तम पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी मानून वाचनालयाचे काम सातत्याने सुरू आहे. क्रांतीदिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या कार्यक्रमाचे औचित्यही वेगळं आहे. ते समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण ठेवायचा उद्देश त्या मागे आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा प्रतिकात्मक सन्मान करण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे, अशा भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केल्या.
चिपळूण येथील स्वातंत्र्यसैनिकांनी ७ सप्टेंबर १९४२ रोजी शहरात मिरवणूक काढून सत्याग्रह केला होता. गांधी चौकात भाषणे झाली होती. त्यानंतर पोलीस आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यात संघर्ष झाला होता. या सत्याग्रहात तेवीस सत्याग्रही कारावासात गेले होते. त्यातील पाच जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती. न्यायालयाने दिलेल्या याबाबतच्या निकालपत्राची प्रत वाचनालयाला उपलब्ध झाली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘लो.टि.स्मा.’ वाचन मंदिराच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे ऑगस्ट क्रांतीदिनी सायंकाळी वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ‘१९४२चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर आमदार निकम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘कोकण मिडिया’चे संपादक प्रमोद कोनकर, चिपळूण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, न्यायालयाच्या मूळ इंग्रजी निकालपत्राच्या अनुवादक श्रीमती शालन रानडे, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव होते. ७ सप्टेंबर १९४२ चिपळूण आंदोलनातील तेवीस देशभक्तांच्या कुटुंबांचा यावेळी ग्रंथभेट देऊन आमदार शेखर निकम आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिकात्मक सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे चिपळूणातील देशभक्तांनी ७ सप्टेंबर १९४२ रोजी शहरात मिरवणूक काढून सत्याग्रह केल्यावर गांधी चौकात भाषण करणारे शांताराम धोंडो तांबट यांचे वारस सुरेश तांबट, न्यायालयाने दिलेल्या चिपळूण आंदोलनाच्या निकालपत्राची प्रत वाचनालयाला उपलब्ध करून देणारे पूर्व अध्यक्ष स्वर्गीय ‘दलितमित्र’ तात्या कोवळे यांचे वारस निहार कोवळे आणि न्यायालयात चिपळूण सत्याग्रहींची बाजू तत्कालिन नामवंत वकील शंकर मोरेश्वर सोबळकर यांच्या वंशजांचाही यावेळी प्रतिकात्मक सन्मान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सविस्तर साधनासाहित लिहिण्याचा दृष्टीकोन समोर ठेवून इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी या पुस्तकाचे संपादन केल्याबद्दल आ. निकम यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या दिलीपराज प्रकाशन यांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे. ‘लोटिस्मा’ने हे पुस्तक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अपरान्तातील स्वातंत्र्यवीरांना अर्पण केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘कोकण मिडिया’चे संस्थापक-संपादक प्रमोद कोनकर म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ ही राजकीय नेत्यांनी दिशा दिल्यानंतर लोकांनी उस्फूर्तपणे केलेली चळवळ होती म्हणून ती यशस्वी झाली. अशा चिपळूणच्या चळवळीबाबतचं हे पुस्तक एकाचवेळी वाचून हातावेगळ करावं असं नाही आहे. या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण काढली जायला हवी आहे. हे पुस्तक वाचताना तत्कालिन व्यवस्था आपल्या डोळ्यासमोर उभी राहाते असे सांगून कोनकर यांनी पुस्तकाचा घोषवारा उपस्थितांना सांगितला. ते म्हणाले, आंदोलनप्रसंगी, ‘पोलिसांनी त्रास दिला असं न्यायाधीश मान्य करायला तयार नव्हते. सरकारी लोकांना पुरावे देण्याची गरज नाही मात्र जनतेने आपली बाजू सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यायला हवेत. केसमध्ये कायद्याचा किस पाडून ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. एकूणात स्वातंत्र्यपूर्व काळात एकतर्फी केस चालत असाव्यात, असं चित्र यातून समोर येत असल्याचं कोनकर म्हणाले. एका बाजूला ‘मिरवणूकवाल्यांचा दोष नाही’ असं न्यायालय म्हणतं. त्याचवेळी पोलिसांनी फक्त मिरवणूक थांबवली असंही म्हणत. पण पोलिसांनी मारहाण केली हे न्यायालय मान्य करायला तयार नाही. या निकालपत्रातील आंदोलकांच्या हातात काठ्या- छत्र्या होत्या हा गुन्हा कसा ठरू शकतो? असा प्रश्नही कोनकर यांनी उपस्थित केला. त्या काळात बाहेर वावरताना काठी हातात घेऊन वावरणं ही पद्धत होती. पावसाळ्याचे दिवस पाहाता छत्री हातात असणे गैर नाही असंही ते म्हणाले. आपण स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घ्यायला हवा. स्वातंत्र्यसैनिकांच्या सत्यकथा तयार करायला हव्यात असे स्पष्ट मत कोनकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय चितळे यांनी केले. रत्नागिरी स्वातंत्रालढ्याचा आपला इतिहास सर्वांसमोर नेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मराठी-इंग्रजी अनुवादक श्रीमती शालन रानडे म्हणाल्या, त्या काळात गावागावातील लोकांनी मोठं काम केलं आहे. एखाद्या मोर्च्यात सहभागी झाल्याबद्दल त्याकाळात होणारी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा मोठी होती असं त्यांनी नमूद केलं. चिपळूण न. प.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी बोलताना, ‘स्वातंत्र्याची मूल्ये सांभाळून लोकशाही पुढे नेण्याचे काम भारतीयांनी केले आहे’, असे नमूद केले. सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. त्यांनी ९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर १९४२ दरम्यान चलेजाव आंदोलना दरम्यान जिल्ह्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. आभार मधुसूदन केतकर यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
www.konkantoday.com