मुंढर येथील शेतकरी महिलेचा विषारी साप चावून मृत्यू
गुहागर : तालुक्यातील मुंढर वळवणवाडी येथील एका शेतकरी महिलेचा विषारी साप चावून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतलेला आहे. तालुक्यातील मुंढर वळवणवाडी येथील शेतकरी महिला प्रभावती प्रकाश मोहिते (वय 59) या आपल्या घराशेजारी असणार्या शेतामध्ये गवत काढत असताना सापाने पायाला दंश केला. त्यानंतर ही महिला घरी आली व तिने शेजार्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी त्यांना वेळीच वाहन न मिळाल्याने बराच वेळ गेला. थोड्या वेळाने वाहन मिळताच ग्रामस्थांनी त्यांना त्या वाहनातून प्रा. आ. केंद्र तळवली येथे उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच सदर महिलेचा वाहनामध्येच मृत्यू झाला असल्याचे तळवली वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. प्रभावती मोहिते या गावी राहत होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली आहेत.